• हिन्दी
  • English
घरगुती चुलीचा एक अभिनव आविष्कार

concept-marathi

बोधकल्पना


पी.आर.एस.-v5  चुलीच्या  निर्मिती मागील प्रेरक नितीतत्वे  मुख्यत: दोन आहेत :

  1. नैसर्गिकरीत्या उपलब्ध बारक्या काटक्या हे घरगुती स्वयंपाकाकरिता सर्वोत्तम इंधनरूप होय

  2. त्यांना आदराने, नीटपणे वापरल्यास घरगुती स्वयंपाकासाठी इंधनटंचाई कधीच भासणार नाही 

आज देशातील गावांमध्ये स्वयंपाक चुलींच्या इंधनाची परिस्थिती म्हणजे  “जळणाचा  नाहक अपव्यय आणि सरपणाचे सदैव दुर्भिक्ष” अशा दुष्टचक्राची एक दारुण कथा बनली आहे.  
जिकडे तिकडे गावकरी लोक सरपणासाठी बेसुमार जंगलतोड करून आपल्या वनसंपदेचा आपल्याच हातांने विध्वंस करीत आहेत. 
प्रत्यक्षात स्वयंपाकासाठी आवश्यक इंधनाच्या तुलनेत ३ ते ५ पटीने जास्त सरपण जाळले जात आहे.   
लोकं आपल्या वनसंपदेचीच नव्हे तर आपल्या आरोग्याचिही राखरांगोळी करीत आहेत.  

केवळ विनाशाकडेच अग्रसर अशी हि वाटचाल आहे आणि तिला रोकलेच पाहिजे. ह्या भयानक परिस्थितीला लवकरात लवकर आळा घातलाच पाहिजे.

जैवभार, व खासकरून लाकडी   सरपण, हा निसर्गाने निर्माण केलेला उर्जेचा महामोठा साठा असून त्याचा आदराने वापर करणे हे आपल्या सर्वांवर, विशेषकरून ग्रामवासियांवर, आज बंधनकारक आहे.   

कोरड्या लाकडात निसर्गाने विलक्षण उर्जा कोंबून साठवलेली असते.  
आपला विश्वास बसणार नाही पण भौतिक विज्ञान असे सांगते कि १ किलो वाळलेल्या लाकडात असलेली ऊर्जा पूर्णतः वापरल्यास १ टन वजन १.५  किलोमीटर उंच उचलून नेता येईल !!  म्हणजेच, माणसांनी भरलेली, ३ लिफ्ट्स जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या वरपर्यंत नेता येतील एवढी ऊर्जा असते ती!!!
  

आपल्याला कळत नाही , पण रस्त्याकाठी पडलेल्या मूठभर सुक्या काटक्यांमध्ये आपल्या घरकुलाच्या एक वेळच्या स्वयंपाकाला लागणाऱ्या औष्णिक ऊर्जेपेक्षा अनेक पटीने अधिक ऊर्जा प्रच्छन्नपणे  भरलेली असते!  
गरज आहे ती केवळ अशा उपकरणाची जे ह्या सुप्त ऊर्जेचे अगदी सावकाशपणे (म्हणजेच अन्नाच्या भांड्याला ग्रहण करता येईल  इतक्याच प्रमाणात) औष्णिक उर्जेत रुपांतर करून अन्न हळू हळू शिजवित ठेवील, व ऊर्जा फारशी वाया जाऊ देणार नाही . 
पी.आर.एस.-v5 चूल अगदी  असेच उपकरण होय !  
हि पी.आर.एस.-v5 चूल  म्हणजे बारक्या काटक्यांना, धूर न होता, अगदी सावकाश व स्थिरपणे जाळत ठेवून त्यांच्यात दडलेली प्रचंड ऊर्जा हळू हळू बाहेर काढून अन्नाच्या भांड्याला पुरवणारे एक कार्यक्षम यंत्र आहे.
पी.आर.एस.-v5 चूल लोकांना कमीत कमी इंधनाचा वापर करून जेवण शिजवायची क्षमता व प्रेरणा देते व तशी शिस्त हि त्यांच्या अंगवळणी पाडते.  त्याच बरोबर हि चूल लोकांच्या स्वयंपाकघरातील धूर संपुष्टात आणून त्यांचे आरोग्यारक्षण करते.

पी.आर.एस.-v5 चूल  हि देशातील ग्रामीण व निम-शहरी भागांत घरगुती स्वयंपाकाचा संपूर्ण नक्षाच बदलून टाकणारी एक विलक्षण वस्तू आहे.  निर्बल व दीनवाण्या दिसणाऱ्या असंख्या बारक्या काटक्या  ज्यांच्याकडे अज्ञानापोटी कोणी सरपण म्हणून बघत देखील नाही, अशा काटक्यांना हि चूल स्वयंपाकाचे प्रमुख व परिपूर्ण इंधन म्हणून मानाचे स्थान मिळवून देते व त्या द्वारे सरपणाच्या शोधात वणवण भटकत असलेल्या ग्रामस्थांचे दैन्य कायमचे मिटवून टाकण्याचे अभूतपूर्व असे आश्वासन देते.  

महागड्या, कारखाना-निर्मित स्वयंपाक इंधनाच्या गुलामीतून व वृक्षतोडीच्या महापापातून गरीब व गरजू जनतेची कायमची  मुक्तता करणे ह्या उच्च ध्येयाच्या पूर्तीकरताच  ह्या  पी.आर.एस.-v5  चुलीचा जन्म झालेला आहे! 

पी.आर.एस.-v5 चुलीचे आश्वासन हेच कि स्वगृहे अथवा स्वग्रामे उपलब्ध असलेला निसर्गिक जैवभार अल्प्मात्रेत, सोप्या, निर्धूर व निर्धोक पद्धतीने  जाळून संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक सहज शक्य आहे आणि तो हि जवळ जवळ विना इंधनपैसा !!  

केवळ दीन-हीन काटक्या ?
नव्हे, हे तर ऊर्जेचे महाभांडार !